ध्येय
नवीन वाट शोधुनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे
मधेच सागरात शीड फाटले जरी
खुळे प्रयास वादळात आटले जरी
नवीन श्वास घेउनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे
प्रलोभनात पाडतील ही सुखे जरी
सदैव हात जोडतील ऐहिके तरी
क्षणैक मोह टाळुनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे
रणात श्वास थांबलेच आजला जरी
तुला न ध्येय साधलेच आजला तरी
नवा विचार ठेवुनी खुशाल जा पुढे
विशाल ध्येय ठेवुनी खुशाल जा पुढे
1 comment:
खुप खुप पॊझिटीव्ह विचार देणारी.
धन्स रे सारंग! याची खरचच खुप गरज होतीच!
Post a Comment