30.1.07

वेडा

कुणी म्हणाले मुर्ख असावा
कुणी म्हणाले प्याला
कोण बोलले काय, कशाचे
भानच नव्हते त्याला

साधा भोळा माणूस अगदी
स्वभाव सुद्धा साधा
काय जाहले कुणा ना कळे
झाली कसली बाधा?

रोज भेटतो असा झाडतो
भर रस्त्यावर पाय
अशा माणसासोबत आपण
बोलावे तरी काय?

कशी लागली आग आतुनी?
काय असावे झाले?
घशास नुसती कोरड कोरड
आणिक डोळे ओले

गल्लोगल्ली फिरतो आता
मधेच खो खो हसतो
मधेच इतका शांत राहतो
कुणामध्येही नसतो

मुले मारती दगडे अन
हा कपडे टाकुन पळतो
लाख माणसे हसती अन
हा आतून तिळतिळ जळतो

कधी एकटा शांत बसून हा
केस खाजवीत हसतो
काळ्या कळकट त्वचेस आणि
हळूच सोलत बसतो

या सगळ्यातून भर माध्यान्ही
त्यास लागता डोळा
खोल आतुनी वठलेला तो
दिसतो चोळामोळा

अन रात्रीचा कर्णबधीरशा
मारत बसतो बोंबा
जणू देवाला विचारतो हा
“सांग कुठे रे थांबा”

4 comments:

चित्तरंजन भट said...

कुणी म्हणाले मुर्ख असावा
कुणी म्हणाले प्याला
कोण बोलले काय, कशाचे
भानच नव्हते त्याला
Good one!

Nandini Desai said...

sarang, veda vaachun kharach ekadam vegale vaatale kaay te sangata yena naahi pan tari ekadam senti..
good one..

Samali said...

hmmm...kharach ekhadya vedyala baghun evadha vichar kadhi karatach nahi apan...kasha mule hi avastha zhali asel tyachi!!!

farach sundar...agdi manala sparshun geli hi kavita.. :)

saurabh said...

kavite che end phar ch chaaan aahe kharach
khup divsan pasun ya blog veryeto aahe ani i must say phar chan sangraha aahe kavitan cha
keep it up :)