Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

1.7.20

विठुराया

वेडी तुझी माया । देवा विठुराया ।
पडतो मी पाया । मायबापा ।।

मन सैरभैर । त्याला नसे ठाव ।
तूच रस्ता दाव । नारायणा  ।।

विनवितो तुला । देवा पांडुरंगा ।
मनातला दंगा । थांबवावा ।।

उजळून जावो । अंतर्बाह्य मन ।
सगुण निर्गुण । एक  होवो ।।

विचारांच्या पुढे । देवा तुझी गती ।
पामराची मती । गुंग झाली ।।


9.3.08

खुळी

उगाच कोणी सांगत बसते काहीबाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही

असाच माझा जरा वेंधळा स्वभाव आहे
चपळाई या शब्दाचाही अभाव आहे
भरीस आला प्रसंग आहे बाका हाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता
हातामधला गुलदस्ता मज देऊ करता
कळून येतो भाव मनातील मग त्यालाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

अंतरातली उलथापालथ मी सावरते
स्पर्शाने अन खुळी तयाच्या मी बावरते
तो चुंबून जातो नकळत माझ्या हातालाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...
............
अन मी रुसून जाता तोही निघून जातो
ओंजळ भरली फुले उशाशी ठेवून देतो
मग मी विसरून जाते सगळे यावेळीही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

मी होता उदास म्हणतो चुकलो आणि
डोळ्यांमध्ये तरारलेले दिसते पाणी
मी विरघळते जैसी साखर दुधामध्ये ही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

4.3.08

खेळ

ती फुलं माळताना जरा काळजी घे
उमलणं हा त्यांना शाप वाटायला नको!

माझ्याशी बोलताना थोडी काळजी घे
जीव लावणं हा मला खेळ वाटायला नको!

कोमेजणं हे दोघांचही अटळ प्राक्तन आहे
फक्त वेळ चुकली असं वाटायला नको!

3.1.08

हळवेपण

कुणी इतकंही हळवं असू नये…
तुझ्या मनावर ओरखडे पडतात
प्राजक्ताची फुलं अंगावर उधळली की…!

वारा उडवून लावतो बाभळीगत काटेरी
मनभर पसरलेली स्वप्ने पाचोळ्यागत
भर पावसात काच तडकल्याचा
आवाजही ऐकू येत नाही
तुझी धाप मात्र घुमत असते नसानसांत…!

आकांत फुलारून आला की
डोळ्यांनी रडून घ्यावं दिलखुलास
चिवटपणे वेदना दाबून ठेवू नये
हळूवार सगळयावर सोडून द्यावं पाणी
तुला म्हणून सांगतो इतकंही हळवं होवू नये कुणी…!

गाफिल क्षण येतातच अनेकदा
आपण मात्र गाफिल असू नये
कुणावर एवढाही विश्वास टाकू नये
हळूवार उसवत जाणारी कळ
ढगांच्याही वर पसरलेली नीळ
आणि जमिनीवर घट्ट रोवलेले पाय
यांच्यात नक्की नातं काय?
असा प्रश्नही पडू देवू नये…
खरंच सांगतो इतकही हळवं असू नये…!

संध्याकाळी समई लावताना
नकळत हात जुळावेत
मनात प्रार्थनांचा कल्लोळ नसेलही
पण हातांवरचा ताबा सुटता कामा नये
किमान एवढा तरी संयम हवाच…!

काल म्हणे तू रडली होतीस
खिडकीचे गज मुठीत चुरगाळत
आणि पाणीही नव्हतं तुझ्या डोळ्यांत
म्हणून हे एक नक्की लक्षात ठेव -
पहाटे प्राजक्ताचा सडा पडण्याआधी वारा येतो
कालचा सडा अलगद घेऊन जातो
तो मात्र पहायचा नाही…
तुला तो पाहवला जायचा नाही…
हळवेपणालाही सीमा हव्याच…!

हळवेपणाचं अस्तित्व हळूवार जपताना
त्याचं हळवेपण कुणालाही कळू नये
वर्षानुवर्षे जपलेलं जाळीदार पिंपळपान
आपल्याच हातांनी जाळू नये…!!!

17.10.07

खरय…

आज काल मी खुपच गप्प गप्प असतो!
पण कारण अगदीच सोप्पं आहे…
प्रेमात यशस्वी होण्यासाठी
शब्दांची गरज असते…
आणि संसारात

मौनाची…

24.7.07

अंगण

कशास असला शाप दिला रे
अंगण ठेवुन गेला
रोज पहाटे प्राजक्ताचा
सडा इथे पडलेला

साफसफाई करावयाची
शपथ घातली आणि
मोबदल्याला देऊन गेला
प्राजक्ताची नाणी

रोज पहाटे मन हे आता
काट्यांमध्ये शिरते
दो हातांचा झाडू होतो
अंगण भवती फिरते

18.7.07

चरा

झाडांवर फुले आणि
पानांवर पाणी
हिर्व्या हिर्व्या रानामध्ये
पाखरांची गाणी

पाण्यासाठी ओढ्याकाठी
थकलेल्या गाई
सोन्याहून पिवळते
गर्द वनराई

ओल्या ओल्या उताराला
लाल लाल कडा
वाटेवर पावलांच्या
प्राजक्ताचा सडा

अशा वेळी पहाटेचा
खळाळता झरा
चालताना भांबावून
तोल जातो जरा

भेटीसाठी वेडावून
सैरा वैरा धावे
एवढे ना कुणासाठी
कुणी वेडे व्हावे

सखयेच्या अंगोपांगी
उडवितो फेस
रुबाबात असे जसे
कुरळेसे केस

परी अशा उधाणाला
गालबोट लागे
पाडतात ओरखडे
वियोगाचे धागे

मिलनाला आतुरल्या
वेड्या चालीमुळे
दगडात पडलेला
चरा हळहळे

6.7.07

कळत जायचं

स्वतःच स्वतःला छळत जायचं
खोल आरपार जळत जायचं,
स्वप्नांमागून वेड्यासारखं सैरावैरा पळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

सगळ्याच जखमा भरतात
खुणाच तेवढ्या मागे उरतात
कोरून कोरून मग खपल्यांनाच छळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

सगळ्यांनाच फुलावं लागतं
निर्माल्यागत मरगळावं लागतं
आपण मात्र सुगंधागत आठवणींतून दर्वळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

माणुसकी हा धडाच असतो फक्त
माणूस म्हणजे हव्यासाचा भक्त
परक्यांसाठी तरीही आतून तळमळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

25.6.07

रांगोळी

आता तिच्या दारापुढे फक्त ठिपके दिसतात
तो प्रत्येक ठिपका तिचा एक बुलंद श्वास असेल बहुदा…
त्याच ठिपक्यांना जगण्याचा एक भाग मानायची ती
ठिपक्यांना सांधणाऱ्या रेषांतून निरागस डोकावायची ती
त्यात भरलेल्या रंगांमधून चंचल अल्लड बागडायची ती
रांगोळीवर ओसंडून वाहणाऱ्या चमकगत चमकायची ती
नाना कळांनी ती असं रांगोळीभर जगून जायची
यापेक्षा काय मोठं असेल रांगोळीचं देणं?
त्या रांगोळीवर चूकून एकदाच पाय पडला होता
पुढे काय झालं कुणास ठाऊक?
रंग फिकटले, धुसर झाले, पार दिसेनासे झाले
रेषा फक्त निळसर नंतर काळ्या काळ्या झाल्या
नंतर केंव्हा झुळकेसरशी वारा तिला घेऊन गेला
आता अंगण सारवणं तर दूरच,
पाचोळाही अधून मधून वाराच साफ करून जातो
माझ्या डोळ्यांतही आता अजब अंधता उतरलीये
रांगोळी प्रथम दिसते मग रांगोळीत ती दिसते
ती हसल्यासारखं वाटताच पुन्हा रंग धुरकटतात
रेषाही क्षणात विरून जातात.
आणि मग उदास उसासे ऐकू येतात शहरभर
कानठाळ्या बसाव्यात असे ते प्रतिध्वनीत होतात
हृदयभर व्यापून रहातात, खोल खोल रुतत जातात
ठिपक्यांनाच श्वास मानायची ती बहुदा…
आता तिच्या दारापुढे फक्त ठिपके दिसतात...

22.6.07

तारण

तूच विसरला ओळख
आता काय जगाचे बोलावे?
कुण्या दारी पण पुन्हा नवे
शब्दांचे तोरण बांधावे?

कैक लक्तरे घेऊन फिरतो
मी शब्दांचा दरवेशी
तसा मांडतो खेळ रोजचा
परी अडकतो अर्थाशी

म्हणून आणले होते तुजला
ठेवून घे हे नवीन तोरण
परी सोडवी जुने कालचे
जुन्याच अर्थांचे तारण

8.6.07

थेंब

निघताना मग ज्या वाटेवर
थोडेसे अन थेंब ढाळुनी
चटकन ‘येते’ म्हणून गेलीस
चटका लावुन…
त्या वाटेवर अजूनही मी
भटकत असतो.
ऐन उन्हाने धुरकटलेले;
केस पांढरे, विस्कटलेले
डोळे अन जणू लाल निखारे
लपवित फिरतो…
तप्त धरेवर अनवाणी अन
पायांसोबत उन्हे बोलता
हसतो थोडे चटके घेवुन…
ओझे ओढत किती भटकलो
मला न ठावे,
किती भटकणे शिल्लक
हेही मला न ठावे..
परी न मजला अजुन गवसले
त्या वाटेवर शोध शोधले
हक्काने मजला दिधलेले
मोत्याचे ते थेंब…

23.2.07

वळण

तुझी आठवण आली
मी रडलोच नाही...
दिवसभर पाऊस पडला
मी भिजलोच नाही...

तासंतास म्हटल्या कविता
तुझा चेहरा मख्ख
तुला कविता आवडत नाहीत
मी समजलोच नाही...

आयुष्यभर हसवणूक केली
क्षणोक्षणी फसवणूक झाली
तुझ्या डोळ्यात आलं पाणी
मी फसलोच नाही...

जगणं म्हणजे झाला खेळ
भल्याबुऱ्याची नुस्ती भेळ
कणाकणाने क्षण गेले;
मी जगलोच नाही...

मुक्कामाला शोधत गेलो
ध्यास घेऊन चालत आलो
हवंहवंस वळण आलं
मी वळलोच नाही...

बाजार

मुर्खांच्या बाजारी
मुर्खांना मोल उरे
कचऱ्यासम रस्त्यावर
फेकुन देतात हिरे
मग आता का रुसणे?
का अन हे हिरमुसणे?
विसरून हे क्षुद्र खेळ

मौनातच रमवी मन !

दिवा

भलतेच काजवे हे घुसले घरात माझ्या !
उपराच राहिलो मी तारांगणात माझ्या !

मी तुळस लावलेली, जाई-गुलाब सुद्धा
पण बाभळीच रुजली या अंगणात माझ्या !

मीही मठात गेलो; अन मंदिरात गेलो
मी चार धाम फिरलो, शांती मनात माझ्या !!

नजरेत पाप आले, मन वासनेत न्हाले
नुस्त्याच आरत्या पण ताला-सुरात माझ्या !!

ना तेल मी दिलेले, ना वातही दिव्याला
अंधार लख्ख अंती दिपला उरात माझ्या...!

7.2.07

प्रश्न

तसा मी कायमच शांत असतो.
मग तुझा प्रश्न कुठलाही असू दे...
एकाच प्रश्नांवर मी निरुत्तर असतो
उरलेल्या प्रश्नांवर मौन पाळतो...

कारण अगदी सोप्पं आहे...
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर मी दिली
तर त्या प्रश्नाचं उत्तर...
तूच मला देशील ही भीती...

जखम

कोरा कागद दिसला
की काहीतरी खरडणं होतं
जुन्याच जखमांना मग
नव्याने भरडणं होतं

6.2.07

कळून आले

शब्दांचे बाण विषारी,
सुटल्यावर कळून आले
जगणे अवघड नव्हते,
मेल्यावर कळून आले

ज्यासोबत जगावयाची
मज सवय लागली होती
ते दुःखही माझे नव्हते
हसल्यावर कळून आले

उधळून टाकले ज्याला
मी फुलापरी तुजवरती
ते हृदय काच होते हे
तुटल्यावर कळून आले

कधी तुला रडू येईल का?
मज खरेच वाटत नव्हते
अंदाज चुकीचा नव्हता
गेल्यावर कळून आले

जगणे तर ओझे होते
मरणेही ओझे झाले
मी ओझे होतो नुसते
नेल्यावर कळून आले


तो डाव हातचा मीही
हसता हसता हरलो
जिंकणेच सोपे असते
हरल्यावर कळून आले

घोळ

चार पाच बगळे
येडे साले सगळे
चोच मात्र पाण्यात; लक्ष सगळं खाण्यात !

चार पाच मित्र
रोज चर्चासत्र
प्रश्न कळत नाहीत; उत्तरे मिळत नाहीत !

चार पाच कवी
वही सुद्धा नवी
दोनच कविता चोख; व्यवहार सगळा रोख !

चार पाच शब्द
त्यांच्यावर प्रारब्ध
चुकले जर का अर्थ; उभं आयुष्यच व्यर्थ !

दुःख

केवढे हे जीवघेणे दुःख असते
आसवे डोळ्यात अन ते मख्ख असते!
वाहतो मातीच माती दुःख वेडा
शेवटाची वात जैसी लख्ख असते!

5.2.07

भेट

कैक दिवस झालेत आता,
आपली भेट झाली नाहीये...
वर्षं लोटलीयेत कदाचीत...
काय गम्मत आहे ना!

बरेच दिवसांपासून मलाही,
स्वप्नं जाळायचा छंद जडलाय...