Showing posts with label जीवनलहरी. Show all posts
Showing posts with label जीवनलहरी. Show all posts

23.2.07

बाजार

मुर्खांच्या बाजारी
मुर्खांना मोल उरे
कचऱ्यासम रस्त्यावर
फेकुन देतात हिरे
मग आता का रुसणे?
का अन हे हिरमुसणे?
विसरून हे क्षुद्र खेळ

मौनातच रमवी मन !

31.1.07

भूल

लाटांचा खळखळाट
जलगंभिर वेणुनाद
सळसळत्या झावळ्यांस
घालितसे चंद्र साद
भीषण गर्जुन रडे
अंधारा पाडि तडे
खोल तरी अंतरात
सागरास भूल पडे

24.1.07

संजीवन

अधरावर थरथरत्या
प्रितीची चाहुल ये
गालांवर रक्तिमशा
लज्जेचे पाउल ये
थरथरत्या हातांनी
बावरल्या श्वासांनी
विरघळ ये मन्मिठीत
संजीवन दोघांना!

20.1.07

खोपा

हतबल मी हतबल तू
हतबल हे जग सारे
पंखांना फडफडत्या
सोडुन गेले वारे
मोडुनिया पडलेले
खोप्याचे रडवेले
भेसुरसे रडगाणे
उधळुन गेले तारे

18.1.07

निरोप

अधरावर थरथरत्या
बोल निरोपाचा ये
काठावर नयनांच्या
थेंब वियोगाचा ये
त्यावेळी जुळव नवे
काव्याचे धुंद थवे
उडवून दे त्यांनाही
कातरल्या संध्येला