Showing posts with label मात्रा वृत्त. Show all posts
Showing posts with label मात्रा वृत्त. Show all posts

24.7.07

अंगण

कशास असला शाप दिला रे
अंगण ठेवुन गेला
रोज पहाटे प्राजक्ताचा
सडा इथे पडलेला

साफसफाई करावयाची
शपथ घातली आणि
मोबदल्याला देऊन गेला
प्राजक्ताची नाणी

रोज पहाटे मन हे आता
काट्यांमध्ये शिरते
दो हातांचा झाडू होतो
अंगण भवती फिरते

18.7.07

चरा

झाडांवर फुले आणि
पानांवर पाणी
हिर्व्या हिर्व्या रानामध्ये
पाखरांची गाणी

पाण्यासाठी ओढ्याकाठी
थकलेल्या गाई
सोन्याहून पिवळते
गर्द वनराई

ओल्या ओल्या उताराला
लाल लाल कडा
वाटेवर पावलांच्या
प्राजक्ताचा सडा

अशा वेळी पहाटेचा
खळाळता झरा
चालताना भांबावून
तोल जातो जरा

भेटीसाठी वेडावून
सैरा वैरा धावे
एवढे ना कुणासाठी
कुणी वेडे व्हावे

सखयेच्या अंगोपांगी
उडवितो फेस
रुबाबात असे जसे
कुरळेसे केस

परी अशा उधाणाला
गालबोट लागे
पाडतात ओरखडे
वियोगाचे धागे

मिलनाला आतुरल्या
वेड्या चालीमुळे
दगडात पडलेला
चरा हळहळे

31.1.07

मन असे तसे

मनाची ओळख
अंधार काळोख
फांदीवर पक्षी
धडधड वक्षी
खळाळते पाणी
कडू गोड गाणी
संध्याकाळ सुस्त
खारुताई मस्त
कधी नवसाचे
कधी पावसाचे

वेडे वेडे मन
ढगातले ऊन
माणसांची वस्ती
भुतावळ नुस्ती
वाऱ्याचा सोसाटा
गावात बोभाटा
आपलेसे सख्खे
नवखेच अख्खे
कधी मागणारे

कधी त्यागणारे

शब्दार्थ

अर्थाचा सागर
शब्दांची घागर
कसा घालू मेळ?
अक्षरांचा खेळ
शब्द एक व्यर्थ
किती तरी अर्थ
असे कसे शब्द
जिण्याचे प्रारब्ध
शब्दांची ही फेरी
भलती लहरी

30.1.07

वेडा

कुणी म्हणाले मुर्ख असावा
कुणी म्हणाले प्याला
कोण बोलले काय, कशाचे
भानच नव्हते त्याला

साधा भोळा माणूस अगदी
स्वभाव सुद्धा साधा
काय जाहले कुणा ना कळे
झाली कसली बाधा?

रोज भेटतो असा झाडतो
भर रस्त्यावर पाय
अशा माणसासोबत आपण
बोलावे तरी काय?

कशी लागली आग आतुनी?
काय असावे झाले?
घशास नुसती कोरड कोरड
आणिक डोळे ओले

गल्लोगल्ली फिरतो आता
मधेच खो खो हसतो
मधेच इतका शांत राहतो
कुणामध्येही नसतो

मुले मारती दगडे अन
हा कपडे टाकुन पळतो
लाख माणसे हसती अन
हा आतून तिळतिळ जळतो

कधी एकटा शांत बसून हा
केस खाजवीत हसतो
काळ्या कळकट त्वचेस आणि
हळूच सोलत बसतो

या सगळ्यातून भर माध्यान्ही
त्यास लागता डोळा
खोल आतुनी वठलेला तो
दिसतो चोळामोळा

अन रात्रीचा कर्णबधीरशा
मारत बसतो बोंबा
जणू देवाला विचारतो हा
“सांग कुठे रे थांबा”

24.1.07

नीज

दाही दिशा झाल्या
अंधाराने ओल्या
डोळ्यांत रंगले
स्वप्नांचे बंगले
अंगणात आले
चांदण्यांचे झुले
अंगभर धूर
मनात काहूर
पापण्यांचे गूज
डोळ्यांवर नीज

“सांभाळ स्वत:ला”

“सांभाळ स्वत:ला” अजुनी सांगत असते!
शपथाही भलत्या सलत्या घालत बसते!
प्रत्येक कळीचे निर्माल्य व्हायचे येथे…
निर्माल्य कधी ना फुलते तिजला ठाऊक नसते!!!

नाणी

आले ऊन
गेले ऊन

बगळ्यांची गाणी!

निळेशार
गार गार
पावसाचे पाणी!

धरेवर
सर्व दूर
सौंदर्याच्या खाणी!

अंगणात
पारिजात
त्याला आली नाणी!!!

जाण

जो जाणेना अन जाणेना, की जाणेना काही
तो मुर्ख तयाला जाण कशाची कधीच आली नाही!

जो जाणे पण ना जाणे की तो जाणे काही;
जागवा तयाला जाण करून द्या पकडून दोन्ही बाही!

जो जाणेना पण हे जाणे की तो जाणेना काही
तो मनुष्य आहे शुद्ध त्यामध्ये सखा जवळचा पाही!

जो जाणे अन हे जाणे की तो जाणे सगळे काही;
मानले गुरु मी त्याला माझा देव त्यामध्ये राही!

20.1.07

कळी!

निर्माल्याची व्यथा वेगळी होती
फुलावयाची हौस आंधळी होती
ना गजरा केला कोणी
ना अर्पियली देवाला
ना मुले वेचण्या आली
ना दिले कुणी प्रेताला
जगण्याचे मग कारण काय म्हणावे
या चिंतेने ती व्यापून सगळी होती
सुटले ना कोडे तिजला
सुकली ती विचार करुनी
मग वारा आला जेंव्हा
क्षणभरात गेली उडुनी
जगण्याला ना अर्थ लाभला साधा
प्रश्नांची ती एक साखळी होती

आठवण

कुठे तरी हरवून गेल्या दिवसाची,
मला तशी आठवण मुक्या पावसाची!

रातराणी जिथे जिथे थांबवते मला;
तिथे येते आठवण सुक्या परसाची!

जिथे तिथे टेकवतो माथा तुझ्यासाठी!
मला कुठे आठवण केल्या नवसाची?