Showing posts with label मुक्तछंद. Show all posts
Showing posts with label मुक्तछंद. Show all posts

3.1.08

हळवेपण

कुणी इतकंही हळवं असू नये…
तुझ्या मनावर ओरखडे पडतात
प्राजक्ताची फुलं अंगावर उधळली की…!

वारा उडवून लावतो बाभळीगत काटेरी
मनभर पसरलेली स्वप्ने पाचोळ्यागत
भर पावसात काच तडकल्याचा
आवाजही ऐकू येत नाही
तुझी धाप मात्र घुमत असते नसानसांत…!

आकांत फुलारून आला की
डोळ्यांनी रडून घ्यावं दिलखुलास
चिवटपणे वेदना दाबून ठेवू नये
हळूवार सगळयावर सोडून द्यावं पाणी
तुला म्हणून सांगतो इतकंही हळवं होवू नये कुणी…!

गाफिल क्षण येतातच अनेकदा
आपण मात्र गाफिल असू नये
कुणावर एवढाही विश्वास टाकू नये
हळूवार उसवत जाणारी कळ
ढगांच्याही वर पसरलेली नीळ
आणि जमिनीवर घट्ट रोवलेले पाय
यांच्यात नक्की नातं काय?
असा प्रश्नही पडू देवू नये…
खरंच सांगतो इतकही हळवं असू नये…!

संध्याकाळी समई लावताना
नकळत हात जुळावेत
मनात प्रार्थनांचा कल्लोळ नसेलही
पण हातांवरचा ताबा सुटता कामा नये
किमान एवढा तरी संयम हवाच…!

काल म्हणे तू रडली होतीस
खिडकीचे गज मुठीत चुरगाळत
आणि पाणीही नव्हतं तुझ्या डोळ्यांत
म्हणून हे एक नक्की लक्षात ठेव -
पहाटे प्राजक्ताचा सडा पडण्याआधी वारा येतो
कालचा सडा अलगद घेऊन जातो
तो मात्र पहायचा नाही…
तुला तो पाहवला जायचा नाही…
हळवेपणालाही सीमा हव्याच…!

हळवेपणाचं अस्तित्व हळूवार जपताना
त्याचं हळवेपण कुणालाही कळू नये
वर्षानुवर्षे जपलेलं जाळीदार पिंपळपान
आपल्याच हातांनी जाळू नये…!!!

17.10.07

खरय…

आज काल मी खुपच गप्प गप्प असतो!
पण कारण अगदीच सोप्पं आहे…
प्रेमात यशस्वी होण्यासाठी
शब्दांची गरज असते…
आणि संसारात

मौनाची…

6.7.07

कळत जायचं

स्वतःच स्वतःला छळत जायचं
खोल आरपार जळत जायचं,
स्वप्नांमागून वेड्यासारखं सैरावैरा पळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

सगळ्याच जखमा भरतात
खुणाच तेवढ्या मागे उरतात
कोरून कोरून मग खपल्यांनाच छळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

सगळ्यांनाच फुलावं लागतं
निर्माल्यागत मरगळावं लागतं
आपण मात्र सुगंधागत आठवणींतून दर्वळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

माणुसकी हा धडाच असतो फक्त
माणूस म्हणजे हव्यासाचा भक्त
परक्यांसाठी तरीही आतून तळमळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

25.6.07

रांगोळी

आता तिच्या दारापुढे फक्त ठिपके दिसतात
तो प्रत्येक ठिपका तिचा एक बुलंद श्वास असेल बहुदा…
त्याच ठिपक्यांना जगण्याचा एक भाग मानायची ती
ठिपक्यांना सांधणाऱ्या रेषांतून निरागस डोकावायची ती
त्यात भरलेल्या रंगांमधून चंचल अल्लड बागडायची ती
रांगोळीवर ओसंडून वाहणाऱ्या चमकगत चमकायची ती
नाना कळांनी ती असं रांगोळीभर जगून जायची
यापेक्षा काय मोठं असेल रांगोळीचं देणं?
त्या रांगोळीवर चूकून एकदाच पाय पडला होता
पुढे काय झालं कुणास ठाऊक?
रंग फिकटले, धुसर झाले, पार दिसेनासे झाले
रेषा फक्त निळसर नंतर काळ्या काळ्या झाल्या
नंतर केंव्हा झुळकेसरशी वारा तिला घेऊन गेला
आता अंगण सारवणं तर दूरच,
पाचोळाही अधून मधून वाराच साफ करून जातो
माझ्या डोळ्यांतही आता अजब अंधता उतरलीये
रांगोळी प्रथम दिसते मग रांगोळीत ती दिसते
ती हसल्यासारखं वाटताच पुन्हा रंग धुरकटतात
रेषाही क्षणात विरून जातात.
आणि मग उदास उसासे ऐकू येतात शहरभर
कानठाळ्या बसाव्यात असे ते प्रतिध्वनीत होतात
हृदयभर व्यापून रहातात, खोल खोल रुतत जातात
ठिपक्यांनाच श्वास मानायची ती बहुदा…
आता तिच्या दारापुढे फक्त ठिपके दिसतात...

22.6.07

तारण

तूच विसरला ओळख
आता काय जगाचे बोलावे?
कुण्या दारी पण पुन्हा नवे
शब्दांचे तोरण बांधावे?

कैक लक्तरे घेऊन फिरतो
मी शब्दांचा दरवेशी
तसा मांडतो खेळ रोजचा
परी अडकतो अर्थाशी

म्हणून आणले होते तुजला
ठेवून घे हे नवीन तोरण
परी सोडवी जुने कालचे
जुन्याच अर्थांचे तारण

8.6.07

थेंब

निघताना मग ज्या वाटेवर
थोडेसे अन थेंब ढाळुनी
चटकन ‘येते’ म्हणून गेलीस
चटका लावुन…
त्या वाटेवर अजूनही मी
भटकत असतो.
ऐन उन्हाने धुरकटलेले;
केस पांढरे, विस्कटलेले
डोळे अन जणू लाल निखारे
लपवित फिरतो…
तप्त धरेवर अनवाणी अन
पायांसोबत उन्हे बोलता
हसतो थोडे चटके घेवुन…
ओझे ओढत किती भटकलो
मला न ठावे,
किती भटकणे शिल्लक
हेही मला न ठावे..
परी न मजला अजुन गवसले
त्या वाटेवर शोध शोधले
हक्काने मजला दिधलेले
मोत्याचे ते थेंब…

23.2.07

वळण

तुझी आठवण आली
मी रडलोच नाही...
दिवसभर पाऊस पडला
मी भिजलोच नाही...

तासंतास म्हटल्या कविता
तुझा चेहरा मख्ख
तुला कविता आवडत नाहीत
मी समजलोच नाही...

आयुष्यभर हसवणूक केली
क्षणोक्षणी फसवणूक झाली
तुझ्या डोळ्यात आलं पाणी
मी फसलोच नाही...

जगणं म्हणजे झाला खेळ
भल्याबुऱ्याची नुस्ती भेळ
कणाकणाने क्षण गेले;
मी जगलोच नाही...

मुक्कामाला शोधत गेलो
ध्यास घेऊन चालत आलो
हवंहवंस वळण आलं
मी वळलोच नाही...

7.2.07

प्रश्न

तसा मी कायमच शांत असतो.
मग तुझा प्रश्न कुठलाही असू दे...
एकाच प्रश्नांवर मी निरुत्तर असतो
उरलेल्या प्रश्नांवर मौन पाळतो...

कारण अगदी सोप्पं आहे...
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर मी दिली
तर त्या प्रश्नाचं उत्तर...
तूच मला देशील ही भीती...

6.2.07

कळून आले

शब्दांचे बाण विषारी,
सुटल्यावर कळून आले
जगणे अवघड नव्हते,
मेल्यावर कळून आले

ज्यासोबत जगावयाची
मज सवय लागली होती
ते दुःखही माझे नव्हते
हसल्यावर कळून आले

उधळून टाकले ज्याला
मी फुलापरी तुजवरती
ते हृदय काच होते हे
तुटल्यावर कळून आले

कधी तुला रडू येईल का?
मज खरेच वाटत नव्हते
अंदाज चुकीचा नव्हता
गेल्यावर कळून आले

जगणे तर ओझे होते
मरणेही ओझे झाले
मी ओझे होतो नुसते
नेल्यावर कळून आले


तो डाव हातचा मीही
हसता हसता हरलो
जिंकणेच सोपे असते
हरल्यावर कळून आले

घोळ

चार पाच बगळे
येडे साले सगळे
चोच मात्र पाण्यात; लक्ष सगळं खाण्यात !

चार पाच मित्र
रोज चर्चासत्र
प्रश्न कळत नाहीत; उत्तरे मिळत नाहीत !

चार पाच कवी
वही सुद्धा नवी
दोनच कविता चोख; व्यवहार सगळा रोख !

चार पाच शब्द
त्यांच्यावर प्रारब्ध
चुकले जर का अर्थ; उभं आयुष्यच व्यर्थ !

5.2.07

भेट

कैक दिवस झालेत आता,
आपली भेट झाली नाहीये...
वर्षं लोटलीयेत कदाचीत...
काय गम्मत आहे ना!

बरेच दिवसांपासून मलाही,
स्वप्नं जाळायचा छंद जडलाय...

31.1.07

कवी

धरलंच जर मी मौन
तर घेतात सगळे डाऊट
म्हणतात नक्कीच साला,
पिऊन झाला असेल आऊट!

जर मी केली बडबड
म्हणतात चढली याला
झेपत नव्हती तरी कशाला
मारून मुटकून प्याला?

विषण्णतेला असे रेखतो
कविता करून घेतो
दाद द्यायला हसती ते;
मी टाळी समजून घेतो

टोचून टोचुन मारायाची
सवयच त्यांना जडलेली
तरीही त्यांना हसवायाची
सजा कवीला घडलेली!

व्यथा

सगळ्याच व्यथांना
औषध नसते
कळेल का तुजला?!
उगाच बांधू
नये धुळींचा
मजल्यावर मजला!

24.1.07

मुरणी

एवढी सुंदर मुलगी, मला कशी ओळखेल?
छट! ती तर मला भलताच समजली असेल…
नाही, नाही नक्कीच हिला पाहिलं आहे कु्ठेतरी
नजर मात्र तिच्या मुरणीवर थांबलीय खरी!
ओळख पटली नाही; पण ती हसली नक्की
आपण तिला ओळखतो- खात्री झाली पक्की
कोण? कुठली? ओळख काय? विचारांच थैमान
तिच्या रुपात न्हाऊन न्हाऊन मन सुद्धा बेभान
पण सालं मुरणीच माझा एवढा जीव का घेतेय?!
आयला! ती पण हसत हसत इकडेच चालत येतेय!!
गोड गुलाबी, सोनपरी ती उंचीपुरी चिकार!
तिच्यापुढे तर साक्षात सगळ्या अप्सरा पण भिकार!!
केवढी सुंदर, केवढी छान, बोलण्यातही हुशार!
तिचा शब्द म्हणजे सगळ्या अंगावरती तुषार!
लाडेलाडे धावू लागली शब्दांमधून हरणी
चांदीत हिरवा खडा घालून नाकात होती मुरणी!
सालं आत्ता आठवलं मी हिला कुठे पाहिलं
तिचा विचार घेऊन मन भुतकाळातच राहिलं
दोन वेण्या, तेलकट चेहरा, नाकालाही धार
मुरडण्याची हौस तिला; मुरणीवर प्रेम अपार!
परिस्थिती गरीब घरची! घरात साधी गिरणी
काँग्रेसच्या मग गवताची ती नाकात घाली मुरणी!
खुदकन हसली ती अन तंद्रीमधून बाहेर पडलो
ओळखलस का मला? म्हणताच मीही पुरता गडबडलो
आता म्हणशील बावळट? बोलता बोलता खेटली
तिला अपेक्षित सगळी उत्तरे डोळ्यांमधून भेटली
पण तू मात्र साऱ्या, भलताच बदलला आहेस
विशीत असून सुद्धा साठीत कलला आहेस!
बोलणं माझं ऐकुन मित्रा तुला नक्कीच बसेल धक्का
पुर्वीच होतास छान आता माकड झालायस पक्का
अळवासारखा चेहरा झाला क्षणात खाल्ली हाय!
बोलण्याआधीच बोलणं संपलं आता पुढं काय?
देवा खरच पटलं मला अफाट तुझी करणी
आयुष्यभर लक्षात राहील आता फक्त मुरणी!
अरे वेड्या लगेच एवढा होवू नको उदास
खरं सांगू? मी तुला केंव्हाचच केलय पास!
आयुष्यभर मला बावळट म्हणत राहाशील का?
बोलताना फक्त असंच डोळे भरून पाहाशील का?
काहीच न कळून मी तिला बसलो पाहात
माझ्या नकळत तिने घेतला हातात माझा हात!
देवा खरच पटलं मला अफाट तुझी करणी
गाढवावरही कधी कधी भाळून जाते हरणी!!
आयुष्यभर समोर राहील आता फक्त मुरणी!!!

गोटा

देवा मला नर्मदेचा गोटाच कर पाहू
रोज रोज हे नवीन अपघात कसे साहू?

सगळ्याच आठवणी आता झाल्यात ओझे
हरेक क्षण फितूर, दुष्मन बनलेत माझे
चुकार, भिकार, टुकार, होकार, नकार
सगळेच विकार मुरलेत खोल आत आता
सांग ना मी एकटा कुणाकुणाला वाहू?
देवा मला नर्मदेचा गोटाच कर पाहू

मी घाबरतो आता माझ्याचसमोर यायला
आरसाही उठतो खायला, त्रास द्यायला
अहम, त्रास, मनस्ताप, विरह, एकटेपणा,
सगळेच ऐकवतात आपआपलेच रडगाणे
या सगळ्यांमध्ये “मी” कोरडा कसा राहू?
देवा मला खरंच नर्मदेचा गोटाच कर पाहू

सर्दी

एकदाच तुझी पावसावरची कविता वाचली
महिना झाला तरी सर्दी हटत नाहीये
कुणी
दिला
तुला
इतकं
भिजवायचा
अधिकार???

20.1.07

सोबत आणि विरह

ती:
निशब्द प्रेम दोन्हीकडे सारखंच असतं
सोबत आणि विरहात एकसारखीच वळणं

तो:
दोन्हीत खूप खूप फरक असतो
सोबत चंदनी ओलावा, विरह अकारण जळणं

कविता

आज ठरवूनच निघालो
म्हटलं शोधूच आज तिला,
माझ्या लाडक्या कवितेला!
मग सगळ्या ठरलेल्या जागा,
सगळ्या संकेतस्थळांना
एक वळसा मारून वर्तुळाकार...
पुन्हा सुरुवात केली तिथेच येऊन थांबलो...
हताश, उदास, एकलकोंडा नेहमीप्रमाणे...

मला अजूनही कळालेलं नाहीये
की परिघावर आयुष्यभर फिरूनही
केंद्रबिंदूशी फक्त नाते सांगता येते
सलगी मिळवता येत नाही!

सांत्वन

येणारे तर येतच गेले
जाणारेही जातच गेले
ज्यांना उर्मी बोलायची
तेवढेच सांत्वन देत गेले
पण दूर एका झाडाखाली
कुणी ढाळली टिपे मुक्याने...

आवाजाने त्या रडण्याच्या
कानच बहिरे होत गेले!

०४/११/०६