24.7.07

अंगण

कशास असला शाप दिला रे
अंगण ठेवुन गेला
रोज पहाटे प्राजक्ताचा
सडा इथे पडलेला

साफसफाई करावयाची
शपथ घातली आणि
मोबदल्याला देऊन गेला
प्राजक्ताची नाणी

रोज पहाटे मन हे आता
काट्यांमध्ये शिरते
दो हातांचा झाडू होतो
अंगण भवती फिरते

18.7.07

चरा

झाडांवर फुले आणि
पानांवर पाणी
हिर्व्या हिर्व्या रानामध्ये
पाखरांची गाणी

पाण्यासाठी ओढ्याकाठी
थकलेल्या गाई
सोन्याहून पिवळते
गर्द वनराई

ओल्या ओल्या उताराला
लाल लाल कडा
वाटेवर पावलांच्या
प्राजक्ताचा सडा

अशा वेळी पहाटेचा
खळाळता झरा
चालताना भांबावून
तोल जातो जरा

भेटीसाठी वेडावून
सैरा वैरा धावे
एवढे ना कुणासाठी
कुणी वेडे व्हावे

सखयेच्या अंगोपांगी
उडवितो फेस
रुबाबात असे जसे
कुरळेसे केस

परी अशा उधाणाला
गालबोट लागे
पाडतात ओरखडे
वियोगाचे धागे

मिलनाला आतुरल्या
वेड्या चालीमुळे
दगडात पडलेला
चरा हळहळे

6.7.07

कळत जायचं

स्वतःच स्वतःला छळत जायचं
खोल आरपार जळत जायचं,
स्वप्नांमागून वेड्यासारखं सैरावैरा पळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

सगळ्याच जखमा भरतात
खुणाच तेवढ्या मागे उरतात
कोरून कोरून मग खपल्यांनाच छळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

सगळ्यांनाच फुलावं लागतं
निर्माल्यागत मरगळावं लागतं
आपण मात्र सुगंधागत आठवणींतून दर्वळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

माणुसकी हा धडाच असतो फक्त
माणूस म्हणजे हव्यासाचा भक्त
परक्यांसाठी तरीही आतून तळमळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं