9.3.08

खुळी

उगाच कोणी सांगत बसते काहीबाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही

असाच माझा जरा वेंधळा स्वभाव आहे
चपळाई या शब्दाचाही अभाव आहे
भरीस आला प्रसंग आहे बाका हाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता
हातामधला गुलदस्ता मज देऊ करता
कळून येतो भाव मनातील मग त्यालाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

अंतरातली उलथापालथ मी सावरते
स्पर्शाने अन खुळी तयाच्या मी बावरते
तो चुंबून जातो नकळत माझ्या हातालाही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...
............
अन मी रुसून जाता तोही निघून जातो
ओंजळ भरली फुले उशाशी ठेवून देतो
मग मी विसरून जाते सगळे यावेळीही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

मी होता उदास म्हणतो चुकलो आणि
डोळ्यांमध्ये तरारलेले दिसते पाणी
मी विरघळते जैसी साखर दुधामध्ये ही
मनात माझ्या मुळीच काही राहत नाही...

4.3.08

खेळ

ती फुलं माळताना जरा काळजी घे
उमलणं हा त्यांना शाप वाटायला नको!

माझ्याशी बोलताना थोडी काळजी घे
जीव लावणं हा मला खेळ वाटायला नको!

कोमेजणं हे दोघांचही अटळ प्राक्तन आहे
फक्त वेळ चुकली असं वाटायला नको!

22.2.08

ऋतू

ऋतू येत होते ऋतू जात होते !
बहरणे फुलांच्या न भाग्यात होते !

इथे तेच जाणून होते यशाला ;
दिमाखात जे जे शिव्या खात होते !

अशा मोगलाईत जन्मास आलो
कलम घेतले की कलम हात होते !

तुझे साफ चुकलेत अंदाज वेड्या
इथे पावसाळे उन्हाळ्यात होते !

कसे बोचते सूख आताच त्यांना?
कधी ते सुखाने व्यथा गात होते !

कुणी चंद्र विश्वास तोडून जातो…
हसे चांदणीचे लिलावात होते…!

नको एवढा जीव लावू कुणाला
युगांचे दिवाळे क्षणार्धात होते !

3.1.08

हळवेपण

कुणी इतकंही हळवं असू नये…
तुझ्या मनावर ओरखडे पडतात
प्राजक्ताची फुलं अंगावर उधळली की…!

वारा उडवून लावतो बाभळीगत काटेरी
मनभर पसरलेली स्वप्ने पाचोळ्यागत
भर पावसात काच तडकल्याचा
आवाजही ऐकू येत नाही
तुझी धाप मात्र घुमत असते नसानसांत…!

आकांत फुलारून आला की
डोळ्यांनी रडून घ्यावं दिलखुलास
चिवटपणे वेदना दाबून ठेवू नये
हळूवार सगळयावर सोडून द्यावं पाणी
तुला म्हणून सांगतो इतकंही हळवं होवू नये कुणी…!

गाफिल क्षण येतातच अनेकदा
आपण मात्र गाफिल असू नये
कुणावर एवढाही विश्वास टाकू नये
हळूवार उसवत जाणारी कळ
ढगांच्याही वर पसरलेली नीळ
आणि जमिनीवर घट्ट रोवलेले पाय
यांच्यात नक्की नातं काय?
असा प्रश्नही पडू देवू नये…
खरंच सांगतो इतकही हळवं असू नये…!

संध्याकाळी समई लावताना
नकळत हात जुळावेत
मनात प्रार्थनांचा कल्लोळ नसेलही
पण हातांवरचा ताबा सुटता कामा नये
किमान एवढा तरी संयम हवाच…!

काल म्हणे तू रडली होतीस
खिडकीचे गज मुठीत चुरगाळत
आणि पाणीही नव्हतं तुझ्या डोळ्यांत
म्हणून हे एक नक्की लक्षात ठेव -
पहाटे प्राजक्ताचा सडा पडण्याआधी वारा येतो
कालचा सडा अलगद घेऊन जातो
तो मात्र पहायचा नाही…
तुला तो पाहवला जायचा नाही…
हळवेपणालाही सीमा हव्याच…!

हळवेपणाचं अस्तित्व हळूवार जपताना
त्याचं हळवेपण कुणालाही कळू नये
वर्षानुवर्षे जपलेलं जाळीदार पिंपळपान
आपल्याच हातांनी जाळू नये…!!!