25.6.07

रांगोळी

आता तिच्या दारापुढे फक्त ठिपके दिसतात
तो प्रत्येक ठिपका तिचा एक बुलंद श्वास असेल बहुदा…
त्याच ठिपक्यांना जगण्याचा एक भाग मानायची ती
ठिपक्यांना सांधणाऱ्या रेषांतून निरागस डोकावायची ती
त्यात भरलेल्या रंगांमधून चंचल अल्लड बागडायची ती
रांगोळीवर ओसंडून वाहणाऱ्या चमकगत चमकायची ती
नाना कळांनी ती असं रांगोळीभर जगून जायची
यापेक्षा काय मोठं असेल रांगोळीचं देणं?
त्या रांगोळीवर चूकून एकदाच पाय पडला होता
पुढे काय झालं कुणास ठाऊक?
रंग फिकटले, धुसर झाले, पार दिसेनासे झाले
रेषा फक्त निळसर नंतर काळ्या काळ्या झाल्या
नंतर केंव्हा झुळकेसरशी वारा तिला घेऊन गेला
आता अंगण सारवणं तर दूरच,
पाचोळाही अधून मधून वाराच साफ करून जातो
माझ्या डोळ्यांतही आता अजब अंधता उतरलीये
रांगोळी प्रथम दिसते मग रांगोळीत ती दिसते
ती हसल्यासारखं वाटताच पुन्हा रंग धुरकटतात
रेषाही क्षणात विरून जातात.
आणि मग उदास उसासे ऐकू येतात शहरभर
कानठाळ्या बसाव्यात असे ते प्रतिध्वनीत होतात
हृदयभर व्यापून रहातात, खोल खोल रुतत जातात
ठिपक्यांनाच श्वास मानायची ती बहुदा…
आता तिच्या दारापुढे फक्त ठिपके दिसतात...

22.6.07

तारण

तूच विसरला ओळख
आता काय जगाचे बोलावे?
कुण्या दारी पण पुन्हा नवे
शब्दांचे तोरण बांधावे?

कैक लक्तरे घेऊन फिरतो
मी शब्दांचा दरवेशी
तसा मांडतो खेळ रोजचा
परी अडकतो अर्थाशी

म्हणून आणले होते तुजला
ठेवून घे हे नवीन तोरण
परी सोडवी जुने कालचे
जुन्याच अर्थांचे तारण

8.6.07

थेंब

निघताना मग ज्या वाटेवर
थोडेसे अन थेंब ढाळुनी
चटकन ‘येते’ म्हणून गेलीस
चटका लावुन…
त्या वाटेवर अजूनही मी
भटकत असतो.
ऐन उन्हाने धुरकटलेले;
केस पांढरे, विस्कटलेले
डोळे अन जणू लाल निखारे
लपवित फिरतो…
तप्त धरेवर अनवाणी अन
पायांसोबत उन्हे बोलता
हसतो थोडे चटके घेवुन…
ओझे ओढत किती भटकलो
मला न ठावे,
किती भटकणे शिल्लक
हेही मला न ठावे..
परी न मजला अजुन गवसले
त्या वाटेवर शोध शोधले
हक्काने मजला दिधलेले
मोत्याचे ते थेंब…